पुणे : धरणसाठा ३२ टक्क्यांवर ; धरणक्षेत्रांत मुसळधारा कायम ; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ११ दिवसांपासून कोसळणारा दमदार पाऊस सोमवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये तब्बल १.२८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ९.४७ टीएमसी म्हणजेच ३२.४८ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६३ टीएमसी म्हणजेच २९.६२ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ०.८४ टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे सोमवारी प्रथमच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त झाला. तसेच खडकवासला धरणात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच असल्याने या धरणातून रात्री ११.३० नंतर ८५० क्युसेक वेगाने मुठा नदीतपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सायंकाळपर्यंत या चारही धरणांमध्ये ८.१९ टीएमसी म्हणजेच २८.११ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत हा पाणीसाठा ९.४७ टीएमसीपर्यंत पोहोचला. पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडून समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ७५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ७४ मि.मी., पानशेत धरण परिसरात ८५ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ६० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ७५ आणि ८४ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात २२ मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर                    ०.६८            १८.२९

वरसगाव              ३.८५             ३०.००

पानशेत                ३.४५             ३२.४१

खडकवासला      ०.४९            ७५.६०

एकूण                     ९.४७            ३२.४८

खडकवासला धरणातून रात्री उशीरा विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने सोमवारी सायंकाळी भरले. त्यामुळे या धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून १००५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता रात्री ११.३० नंतर मुठा नदी पात्रात ८५६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडाळकर यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply