पुणे : दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; जिल्ह्यातील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार,प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेंतर्गत दुबार, मयत अशा सुमारे दोन लाख ८१ हजार ५८९ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून नुकतीच जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार ९५० इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात असून याठिकाणी पाच लाख १६ हजार ८३६ मतदार आहेत. त्यापाठोपाठ शहरातील हडपसर मतदारसंघात पाच लाख ६१ हजार ९८८ मतदार आहेत, तर सर्वांत कमी मतदार पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघात असून याठिकाणी दोन लाख ६५ हजार ९५ मतदार आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रारूप मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येते. या मतदार यादीवर हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर सुनावणी घेऊन ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. या कार्यक्रमानुसार सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव नोंदविणे, मतदार यादीतील दुबार आणि मयत नावे वगळणे आदी कामे हाती घेतली जातात.

दरम्यान, जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती ८ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी खास मोहिमा राबविण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
वडगाव शेरी – ४,२६,७९७, शिवाजीनगर – २,७३,९३४, कोथरुड – ३,८५,०७७, खडकवासला – ५,०६,५२१, पर्वती – ३,२७,९२६, हडपसर – ५,२५,१७४, पुणे कॅन्टोन्मेंट- २,६५,०९५,

कसबा पेठ – २,७४,३७७, चिंचवड – ५,६१,९८८, पिंपरी – ३,५५,७५८, भोसरी – ५,०५,८८५, जुन्नर – ३,०६,२५७, आंबेगाव – २,९५,५९६, खेड आळंदी – ३,२९,६४४, शिरूर – ४,०९,३२२, दौंड – ३,०४,४७२, इंदापूर – ३,१३,१८४, बारामती – ३,५५,१४७, पुरंदर – ४,०७,८५७, भोर – ३,८९,६४१ आणि मावळ – ३,५७,२९८



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply