पुणे : दीर्घकालीन कृती आराखडा; नवले पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री झालेल्या अपघातानंतर पोलीस तसेच प्रशासनाकडून अपघात रोखणे तसेच वाहतूक विषयक उपाययोजना करण्याबाबत कृती आराखडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, महापाालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, महापालिकेच्या वाहतूक विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले, तसेच सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. बाह्यवळण मार्गावर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश आले. रविवारी रात्री झालेल्या अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर अपघात रोखण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्र आल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

अपघातानंतर ट्रकचालक पसार
अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर अपघात नेमका कसा झाला, याबाबतची माहिती चाैकशीत मिळेल. नवले पुलावरील तीव्र उतारावर ट्रकचालकाने ट्रक बंद केला. ‘न्यूट्रल’ स्थितीत ट्रक पुढे नेण्यात आला. काही अंतरावर गर्दीमुळे वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर ट्रकने वाहनांना धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.

बैठकीतील निर्णय
कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत तीव्र उतार आहे. या भागात वाहनांचे वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक (रम्बलिंग स्ट्रीप) आहेत. गतिरोधक सुस्थितीत राहण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. सोमवारी महापाालिका प्रशासनाने सेवा रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या भागातील एसटी बस, पीएमपी बसचे थांबे सुरक्षित ठिकाणी असायला हवेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना


स्वामी नारायण मंदिर तसेच दरीपुलापर्यंत तीव्र वळण कमी करणे

नवले पूल परिसरातील तीव्र उतार कमी करण्याबाबत उपाययोजना

जड वाहनांचा वेग टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी गतिरोधक

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत वाहनचालकांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणा

जड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ४० किलोमीटर करणे

स्पीडगन, कॅमेरे बसविणे

मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविणे

पुलावर पारदर्शक पट्टी बसवणे

वाहनचालकांच्या नजरेत भरणारे वाहतूक फलक

नऱ्हेतील सेल्फी पाॅईंट पाडून टाकणे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply