पुणे टपाल खाते देशभरात विमा संकलनात आघाडीवर; पुणे विभागात १ लाख १५ हजार विमाधारक

पुणे : इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग (आयपीपीबी) अंतर्गत जनरल इन्शुरन्स योजनेमध्ये टपाल खात्याच्या पुणे विभागाने भारतात सर्वाधिक विमा हप्ता संकलन करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे विभागाने १.६६ कोटी रुपयांचे संकलन केले असून, १ लाख १५ हजार ४२ नागरिकांचा विमा उतरविला आहे.

राष्ट्रीय टपाल सप्ताहाअंतर्गत पुणे विभागाने केलेल्या कामगिरीची माहिती पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टपाल सेवा विभागाच्या संचालक सिमरन कौर आणि पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार या वेळी उपस्थित होते.

जायभाये म्हणाले,की पुणे विभागाअंतर्गत पुणे, नगर, सोलापूर, सातारा हे चार जिल्हे येतात. ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाअंतर्गत ३ हजार २१३ नवीन बचत खाली उघडण्यात आली. १ हजार ९८८ नवीन विमा पाॅलिसी वितरित करण्यात आल्या. ग्रामीण भागांतही बचत खाती, विमा पॉलिसी आणि टपाल खात्याच्या विविध बचत योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढीस लागली आहे. ९२ खेडी संपूर्ण सुकन्या ग्राम घोषित केली असून, नऊ खेडी ‘फाईव्ह स्टार’ म्हणून घोषित केली आहेत. १५ खेडी संपूर्ण विमा ग्राम म्हणून घोषित केली आहेत. चार जिल्ह्यांत एकूण ८ पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रं आहेत. या वर्षांत आत्तापर्यंत ३२ हजार पेक्षा जास्त पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया येथून पूर्ण करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथे पार्सल पॅकिंग युनिट सुरू करण्यात आले आहे. तसेच, सहा ई-बाईक्स् सुरू केल्या असून, त्याद्वारे नागरिकांना टपालाचे वितरण कऱण्यात येते.

  • पुणे विभागात एकूण ५५ लाख १० हजार बचत खाती
  • पुणे विभागात यंदा ३.७१ लाख नवीन बचत खाती उघडण्यात आली
  • पुणे विभागात ‘आयपीपीबी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक नवीन खाती उघडली
  • पुणे विभागातून १,९१,४५५ तिरंगा झेंड्यांचे वितरण. त्यापैकी १८,६१४ ऑनलाइन वितरित
  • पुणे विभागात पाच लाखापेक्षाही अधिक मुलींची सुकन्या समृद्धी खाती

पुण्यातील जनरल पोस्ट ऑफीस (जीपीओ) ची इमारत ‘वारसा वास्तू’ म्हणून घोषित केलेली आहे. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेज’च्या (इंटॅक) माध्यमातून वास्तूचे संवर्धन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात येत असून त्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. लवकरच या कामासही सुरुवात होईल, असे मत पुणे टपाल विभागाचे जनरल पोस्टमास्तर रामचंद्र जायभाये यांनी व्यक्त केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply