पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्याला अटक; एका महिलेविरुद्ध गुन्हा

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर मोबाइलवर चित्रीकरण करून बंदोबस्तावरील पोलीस हवालदाराशी अरेरावी केल्या प्रकरणी एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली. कोथरुडमधील महात्मा सोसायटीत ही घटना घडली.

या प्रकरणी सचिन कुदळे (वय ४२, रा. महात्मा सोसायटी, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोालीस हवालदार सचिन सोनवणे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुदळे आणि एक महिला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर थांबले. बंदोबस्तावरील पोलीस हवालदार सोनवणे यांनी दोघांकडे विचारणा केली. काय काम आहे. ही थांबण्याची जागा नाही, असे हवालदार सोनवणे यांनी दोघांना सांगितले.त्या वेळी कुदळे याने हवालदार सोनवणे यांच्याशी हुज्जत घालून मोबाइलवर चित्रीकरण केले. संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुदळे याच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.

समाजमाध्यमावर तेढ निर्माण प्रकरणी गुन्हा
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करुन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी सचिन कुदळे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा कोथरुड पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत अभिषेक कांगणे (वय २५) याने या संदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुदळे याने त्याच्या समाजमाध्यमातील खात्यावर मजकूर प्रसारित करुन समाजात तेढ निर्माण केल्याचे कांगणे याने फिर्यादीत म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply