पुणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील भारतीय लस आजपासून बाजारात; सीरमतर्फे ‘सर्वावॅक’ची निर्मिती

पुणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेली ‘सर्वावॅक’ लस आज (गुरुवार, १ सप्टेंबर) बाजारात उपलब्ध होणार आहे. या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) जुलै महिन्यात मान्यता दिली होती.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या लशीचे अनावरण होणार आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यावेळी उपस्थित राहणार आहेत. सीरमतर्फे तयार करण्यात आलेली सर्वावॅक ही एचपीव्ही प्रतिबंधक लस ही क्वाड्रिव्हॅलंट प्रकारातील असून सध्या उपलब्ध लशींच्या तुलनेत तिची गुणकारकता एक हजार पटींनी जास्त असल्याचे  चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे.  गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार, ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. १५ वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका  आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. सध्या उपलब्ध लशींमध्ये भारतीय पर्याय नसल्याने हे लसीकरण सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात नव्हते. मात्र, सीरमच्या भारतीय बनावटीच्या लशीच्या उपलब्धतेमुळे हे चित्र बदलणार आहे. सीरमतर्फे बनवण्यात आलेली लस सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने दिलेल्या परवानगीनंतर सीरमचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी  दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply