पुणे: खंडणी न दिल्याने व्यावसायिकावर कोयत्याचे वार, तिघांना अटक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे खंडणी न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत. टोळक्यानं परिसरातील नागरिकांना धमकावून दहशत पसरवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

शिवराज शिंदे, मनोज चांदणे उर्फ मन्या, संजय चव्हाण आणि निखिल इंगळे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिवराज शिंदे, मनोज चांदणे आणि निखिल इंगळे यांना अटक केली आहे. यातील आरोपी शिंदे आणि चांदणे सराईत गुन्हेगार आहेत. याबाबत अनिल दौलत भुवड (वय ४३, रा. श्री गणेश एनक्लेव्ह) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भुवड यांची श्री गुरुदत्तकृपा लाँड्री आहे. घटनेच्या दिवशी आरोपी शिंदे, चांदणे, चव्हाण, इंगळे फिर्यादीच्या दुकानात आले होते. यावेळी आरोपींच्या हातात कोयते होते. परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आरोपींनी शिवीगाळ करत दहशत माजवली आणि भुवड यांच्याकडे त्यांनी खंडणीची मागणी केली. भुवड यांनी खंडणी देण्यास विरोध केला. खंडणी न दिल्याच्या कारणातून आरोपींनी फिर्यादींवर कोयत्याने वार केले. यावेळी आरोपींनी घटनास्थळी असणाऱ्या अक्षय भोईटे यालाही मारहाण केली.

दरम्यान, पुण्यात कोयत्यानं वार केल्याची आणखी एक घटना घडली आहे. याप्रकरणी समीर दिलीप रानवडे (वय २९, रा. श्रीरंग अपार्टमेंट, नऱ्हे) यानं फिर्याद दाखल केली आहे. रानवडे श्रीरंग अपार्टमेंटसमोर दुचाकी लावत होते. त्यावेळी आरोपी शिवराज शिंदे आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी रानवडेला शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे घटनेचा पुढील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply