पुणे : कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुण्यातील ११ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ३० हजार गुन्हेगारांची यादी तयार

कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी शहरातील दहा हजार ९७३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोयते उगारुन दहशत माजविणे, खून, घरफोडी, साखळी चोरी अशा गुन्ह्यांतील दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोयता गँगच्या दहशतीच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

गंभीर गुन्हे करणाऱ्या शहरातील ३० हजार गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. कोयता गँगला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दररोज सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली आहे. गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील १० हजार ९७३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) शहरातील चार गुंडांची रवानी कारागृहात करण्यात आली आहे. त्यांना वर्षभरासाठी कारागृहात ठेवण्यात येणार आहे. शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून बारा टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली. गस्त घालणाऱ्या पोलिसांना पिस्तूल तसेच अद्ययावत दुचाकी देण्यात येणार असून गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची खास तुकडी तयार करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply