पुणे : कोथरुडमध्ये ज्येष्ठ नागरिकाला लुटून नाल्यात ढकलले ; चोरट्यांचा शोध सुरू

 

पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नाल्यात ढकलून देण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावर मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

कोथरुडमधील मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरातील एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ते सोसायटीच्या परिसरातून जात होते. कर्वे रस्त्यावरील मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ त्यांना चोरट्यांनी गाठले. धक्काबुक्की करुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना नाल्यात ढकलले. नाल्याला कठडा नसल्याने ते सात फूट उंचीवरुन नाल्यात पडले. या घटनेत त्यांना फ्रॅक्चर झाले. या भागातील एका सोसायटीतील रहिवासी नागेशकुमार नलावडे तसेच कर्वे रस्त्यावर टेम्पो चालकांच्या लक्षात लुटमारीचा प्रकार आला. नलावडे यांनी त्वरीत या घटनेची माहिती कोथरुड पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्ट्रेचरचा वापर करुन त्यांना नाल्यातून बाहेर काढले. नलावडे आणि टेम्पो चालकांनी आरडाओरडा केला. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरटे नाल्यातून पसार झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply