पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार

पुणे - मॉन्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्यात पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आजपासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असून, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून छत्तीसगड, सीमांध्र, रायलसीमापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण भारतात परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती असून, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

विदर्भात उष्ण लाट कायम असून, चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास आहे. बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान होत असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र, अरबी समुद्रातून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मॉन्सून वाटचाल ‘जैसे थै’ आहे.

वादळी पावसाचा इशारा

  • कोकण - ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

  • मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी.

  • विदर्भ - बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply