पुणे : ‘एफटीआय’च्या आवारात चंदन चोरी करणारे अटकेत ; चंदन चोरीची पाच गुन्हे उघड; ९५ किलो चंदनाची लाकडे जप्त

पुणे : आठवड्यापूर्वी विधी महाविद्यालय रस्त्यावरील भारतीय चित्रपट निर्मिती संस्थेच्या (एफटीआय) आवारातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून चंदन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

लहू तानाजी जाधव (वय ३२), हनुमंत रमेश जाधव (वय ३०), महादेव तानाजी जाधव (वय ३०, तिघे रा. चौफुला चौक, धायगुडे वाडी, ता. दौंड, जि. पुणे), रामदास शहाजी माने (वय २८, रा. मोडवे, खोमणे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अशोक मच्छिंद्र तांदळे (वय ३०, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर भागातील अरण्येश्वर इंग्लिश स्कुल, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) आवारातून चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. आठवड्यापूर्वी चोरट्यांनी एफटीआयच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेली होती.

या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. एनडीएच्या आवारातून चोरलेल्या चंदनाच्या झाडाचे खोड तांदळेला विकण्यात आले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तांदळेच्या घरी गेले. तेव्हा तांदळे घरात नसल्याचे आढळून आले. त्याची पत्नीकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा तांदळेच्या घरातून ८५ किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली. चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांची टोळी सिंहगड रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी जाधव, माने यांना सापळा लावून पकडण्यात आले.

त्यांच्याकडून चंदनाचे झाड कापण्यासाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाडे, रिकामी पोती, वाकस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी जाधव आणि माने यांच्याकडून दहा किलो चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, गुंगा जगताप, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply