पुणे – एक महिन्यात सहा लाख प्रवाशांनी केला पुण्यातील मेट्रोतून प्रवास !

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सुमारे ६ लाख प्रवाशांनी महिनाभरात प्रवास केला आहे. त्यातून मेट्रोच्या तिजोरीत सुमारे ८० लाखांचे उत्पन्न जमा झाले आहे. एकूण प्रवाशांत पुण्यातील चार लाख तर, पिंपरी चिंचवडमधील दोन लाख प्रवाशांचा समावेश आहे.

पुण्यातील वनाज - गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटरच्या तर, पिंपरी - फुगेवाडी या सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. दोन्ही शहरांत पहिल्या दिवसांपासूनच नागरिकांनी मेट्रो प्रवासाबद्दल उत्सुकता दर्शविली. दोन्ही शहरांत सुट्टीच्या दिवशी मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण महामेट्रोने नोंदविले आहे.

पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्याची लोकसंख्या जास्त आहे. तसेच पुण्यातील मेट्रो मार्गाभोवती लोकसंख्येची घनताही जास्त आहे. त्यामुळे पुण्यातील मेट्रोला प्रतिसाद जास्त आहे, असे वाटत असले तरी, पिंपरी चिंचवडमध्येही मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. वाढदिवस, पुस्तक प्रकाशन, काव्य मैफील आदी उपक्रमही पुणेकरांनी मेट्रोमध्ये केले. तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सहलींनीही मेट्रो एक महिन्यांत गजबजून गेली, असेही महामेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन झाले तेव्हा सकाळी ८ ते रात्री ९, अशी मेट्रो प्रवासाची वेळ होती. मात्र, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शनिवार, रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रोची वेळ १ तासाने म्हणजे रात्री १० वाजे पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच प्रवासी संख्या लक्षात घेता मेट्रोच्या वारंवारितेत अर्ध्या तासाऐवजी २५ मिनिटे वेळ करण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यात नजीकच्या काळात बदल होऊ शकतो, असेही त्यंनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply