पुणे : उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने रेल्वेच्या जनरल तिकिटासाठी प्रवाशांची धडपड

पुणे : उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. आरक्षित तिकीटासह जनरल तिकिटाची विक्री सुरू आहे. मात्र, चालू तिकीट खिडक्यांची संख्या मर्यादित आहे. एकीकडे जनरल तिकिटासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे लाखो रुपये खर्चून आणलेले एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन) बंदच आहेत. मशिन बंद असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागते. मशिन सुरू झाले, तर प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. परिणामी, त्यांचा वेळ वाचेल.

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यात मेल एक्स्प्रेसच्या प्रवाशांसह लोकल, मेमूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. रेल्वे प्रशासनाने पुण्याहून सुटणाऱ्या निवडक रेल्वे गाड्यांना जनरल तिकिटाची विक्री सुरू केली आहे. त्याच वेळी ‘एटीव्हीएम’ सुरू करणे आवश्यक होते. मात्र, याकडे वाणिज्य विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी, या मशिन आता धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना रांगेत थांबून तिकीट घ्यावे लागते आहे. रांग जर मोठी असेल, तर गाडी सुटण्याच्या भीतीने अनेक प्रवासी तिकीट न घेताच पळ काढतात. परंतु, काही प्रवासी तिकीट लवकर मिळावे म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, नियोजन नसल्याने त्याचा थेट फटका सामान्य प्रवाशांना बसतो आहे. त्यामुळे तत्काळ मशिन सुरू करण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली.

या गाड्यांना जनरल तिकीट

पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस व इंटरसिटी एक्स्प्रेस. तसेच, पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड मेमू, पुणे-सातारा डेमू, तसेच पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेस आदी गाड्यांना पहिल्या टप्प्यात जनरल तिकीट विक्री सुरू आहे.

दररोज किमान तीन हजार प्रवासी

पुणे स्थानकावरच्या बुकिंग कार्यालयातून दररोज सुमारे तीन ते साडेतीन हजार जनरल तिकिटांची विक्री होते. ही सर्व तिकिटे मशिन बंद असल्याने प्रवाशांना वेळ खर्ची घालून तिकीट खिडक्यांच्या रांगेत उभे राहून काढावे लागते आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply