पुणे : उद्योजकतेसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण - स्वित्झर्लंडचे राजदूत हेकनर

पुणे - ‘स्वित्झर्लंड येथे गुंतवणूक करणाऱ्या १०० पैकी ६० कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. उद्योजकता, नाविन्यता व लोकसंवाद यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. विशेषत: पुणे शहरामध्ये कौशल्य विकास, संशोधन व नावीन्यता, गुंतवणूक आणि डिजिटायझेशनचे मुख्य केंद्र बनण्याची क्षमता आहे,’ असे मत स्वित्झर्लंडचे राजदूत डॉ. राल्फ हेकनर यांनी व्यक्त केले.

इंडो-स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स (आयएससीई) व मेरीटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) यांच्यातर्फे कोरेगाव भीमा येथे उभारण्यात आलेल्या स्किलिंग सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी व स्कीलिंग सेंटर फॉर अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस (यूडीए) या कौशल्य विकास केंद्राला डॉ. हेकनर यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी स्वित्झर्लंडचे कॉन्सुलेट जनरल मार्टिन मायर, ‘आयएससीई’चे अधक्ष मुकेश मल्होत्रा, ‘फाइन ऑरगॅनिक्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयेन शाह, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, आयएससीई, पुणे व सिंजेटा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जोग, आयएससीई (यूडीए) सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त), व्हाइस अॅडमिरल डी. एस. पी. वर्मा (निवृत्त), महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर आणि ‘एमआरसी’चे संस्थापक-संचालक कमांडर डॉ. अर्णब दास (निवृत्त), ‘एमआरसी’चे सल्लागार प्रफुल्ल तालेरा आदी उपस्थित होते.

डॉ. हेकनर म्हणाले, ‘उद्योजकतेत गेल्या ७५ वर्षांत भारताने बरीच प्रगती केली आहे. भारतात सुमारे ३३० स्विस कंपन्या आहेत ज्यापैकी फक्त २ ते ३ कंपन्या या स्विस नागरिक चालवतात, तर उर्वरित भारतीय नागरिकच चालवतात. स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाले पाहिजेत. उभय देशांना धोरणात्मक स्तरावर आणि डिजिटल क्षेत्र विकासासाठी एकत्र काम करण्यास अधिक संधी आहेत.’

लेफ्टनंट जनरल शेकटकर (निवृत्त) म्हणाले, ‘‘भारतात कौशल्य विकासाची अधिक गरज आहे. जहाजांमध्ये वेल्डिंगच्या कामासाठी सध्या ३१ प्रकारचे वेल्डर आवश्यक आहेत, मात्र बहुतांश वेळा ते आपल्याला अमेरिकेमधून आयात करावे लागतात. या परिस्थितीत अशा प्रकारचे कौशल्य केंद्र तरुणांना भविष्यकालीन कौशल्ये आत्मसात करण्यात मदत करेलच, त्याचबरोबर पुढील ५-१० वर्षांत व्यवसायातील संभाव्य बदलांची माहिती देण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply