पिंपरी : शेखर सिंह यांनी पिंपरी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

पिंपरी : पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरूवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी पदभार स्वीकारला. यावेळी महापालिकेचे मावळते प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व उल्हास जगताप यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाटील यांची बदली रद्द झाल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.

राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) बदली झाली. पाटील यांची कार्यपध्दती, निर्णयप्रक्रियेत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला कल व भाजपची तीव्र नाराजी यासारख्या कारणांमुळे १८ महिन्यांतच त्यांना बदलीला सामोरे जावे लागले. शेखर सिंह नवे आयुक्त असतील, हे मंगळवारी दुपारीच स्पष्ट झाले होते. मात्र, गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी सूत्रे स्वीकारली. या दरम्यानच्या काळात राजेश पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याची जोरदार चर्चा शहरभर पसरली होती. नवे आयुक्त बुधवारी पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही. ते बुधवारी सायंकाळनंतर शहरात दाखल झाले. त्यांची मुक्कामाची व्यवस्था भोसरीजवळ ‘सीआयआरटी’च्या विश्रामगृहात करण्यात आली होती. शहरात असूनही ते गुरूवारी सायंकाळपर्यंत पालिकेत आले नाही. दुसरीकडे, राजेश पाटील व त्यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे दोघेही मुंबईत होते. बदली रद्द करण्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. शेखर सिंह यांना रूजू होण्यास झालेला उशीर आणि पाटील-ढाकणे यांची तातडीची मुंबईवारी, यावरून बदली रद्द होण्याविषयीची चर्चा दिवसभर सुरूच राहिली. अखेर, सायंकाळी शेखर सिंह पालिकेत आल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

आतापर्यंत बहुतांश ग्रामीण भागात काम केले आहे. यापूर्वी साताऱ्यात जिल्हाधिकारी होतो. देशात व राज्यात स्वतंत्र ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची व्याप्ती मोठी आहे, असे सांगत आरोग्य आणि शिक्षण हे आपल्या आवडीचे विषय असून त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे नवे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेट्रोसारखे प्रमुख प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाण्याचा निचरा, नागरिकांच्या सोयीचे विषय तसेच शहरातील विकसित होणाऱ्या भागांसह औद्योगिक पट्यात पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, जेणेकरून शहरवासीयांना चांगल्या सोयी उपलब्ध करता येईल, याकडे कटाक्ष राहील, असे ते म्हणाले. राजेश पाटील यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती, या चर्चेत काहीच तथ्य नाही. मी सुट्टीवर होतो. मला पोहचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे वेळेत पदभार घेता आला नाही. राजेश पाटील यांना तातडीच्या कामासाठी मुंबईत जावे लागले, असे सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply