पिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलांना करायला लावायचे चोरी, मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड : पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही मुलांना कामाला लावतो असे सांगून त्यांना जास्त पैशांचे आमिष दाखवण्यात आले. पोलिसांनी या मुलांकडून तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिन्यांसह एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अल्पवयीन मुलांना 150 सीसीटीव्ही तपासून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या प्रकरणात दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरून पसार होणारे अल्पवयीन मुलं पायी चालत जाणाऱ्या महिलांना टार्गेट करायचे. या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावून ही मुलं दुचाकीवरून धूम ठोकायचे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या मुलांना ओटा स्कीम निगडी येथून ताब्यात घेतले आहे.

या अल्पवयीन मुलांकडे अधिक चौकशी केल्यानंतर नितीन संजय सरोदे आणि दिलीप रामदास खंदारे या दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केलं आहे. हे आरोपी अल्पवयीन मुलांच्या पालकांना मूव्हर्स अँड पॅकर्स या कंपनीमध्ये मुलांना कामाला लावतो असे सांगून त्यांना घरातून घेऊन जात. जास्त पैसे देतो असे आमिष दाखवून आरोपी या अल्पवयीन मुलांना चोरी करायला लावायचे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply