परभणी : सहलीला जात असलेल्या स्कूल बसचा भीषण अपघात; एसटीच्या धडकेने २२ जण जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

परभणी शहरात सहलीला निघालेली शाळेची बस आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही वाहनांनी एकमेकांना जोरात धडक दिल्याने २२ हून अधिक व्यक्ती यात जखमी झाले आहेत. तसेच चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पिपिंळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची ही स्कूल बस होती. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस चाकूरच्या दिशेने जात होती. तसेच अहमदपूर येथून एसटी बस बुलढाण्याच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने गंगाखेडच्या खंडाळी गावाजवळ आले असता त्यांचा अपघात झाला. या अपघातात प्रवाशी आणि विद्यार्थी अशा २२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एसटी बसचा वाहनचालक गाडीतच अडकला होता. त्याला केबिनमधून बाहेर पडता येत नव्हते. अशात शर्तीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढण्यात आले. यात वाहनचालक देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेत नेमकी कुणाची चूक होती याची माहिती अद्याप समजलेली नाही. मात्र एसटी चालकाने मद्य सेवन केल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेत अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply