निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार

राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे.

विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे -

भाजपा - राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना - आमश्या पाडवी, सचिन अहिर

राष्ट्रवादी - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

भाजपने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मतदानाला बोलावणे हे असंवेदनशील असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.

 

काँग्रेसचा भाजपच्या मतांवर केलेला आक्षेप निवडणूक आयोगाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी फेटाळले असून हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपावर भाजपची उत्तर देण्याची तयारी असून आम्ही रीतसर परवानगी काढली होती असं भाजपने सांगितलं आहे.

काँग्रेसच्या आक्षेपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसने आयोगाकडे तक्रारीचा मेल केला होता. आयोगाच्या निकालानंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

 

शिवसेनेने आपल्या पहिल्या पसंतीच्या आमदाराला ३२ मतांचा कोटा दिला आहे. तर भाजपने ३० मतांचा, काँग्रेसने २९ आणि राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारांसाठी २९ मतांचा कोटा ठरवल्याची माहिती आहे.

काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

सुधीर मुनगंटीवार : काँग्रेसला पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आरोप केले जात आहेत

थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आरोप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका इतर सहकाऱ्यांनी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

विधान परिषदेसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रत्येकी २६ मतांची गरज आहे.

सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असतानाही सुप्रीम कोर्टाने सुनावणीवर निकाल जाहिर केला.

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना विधानभवनात भेटीगाठींचा जोर वाढला आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांची घेतली भेट.

दुपारी 3 वाजेपर्यंत 279 जणांचं मतदान, अद्याप सहा आमदारांचं मतदान बाकी आहे. मतदानासाठी केवळ ५० मिनिटं उरली आहेत. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच मतदान राहिलं आहे.

विधानपरिषद निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 जणांचं मतदान, अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी

लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुगणवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले आहे. त्यांना काल ताप होता. मात्र जिद्दीने ते मतदान करण्यासाठी आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पक्षाप्रती त्यांच्या कमिटमेंटला आम्ही सलाम करतो, असं फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद निवडणूक दुपारी १ वाजेपर्यंत एकूण मतदान २४६ पूर्ण

नाराजी सर्वांची दूर केली आहे. ५ वाजता चित्र स्पष्ट होईल. मतदान बाद होणार नाही याची काळजी घेतली आहे. वरिष्ठ नेते चर्चा करुन निर्णय घेत आहेत. अशी प्रतिक्रीया दत्ता भरणे यांनी यावेळी व्यक्त केली.

फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा मविआच्या सहाव्या उमेदवाराला. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळी दिली.

भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना आणण्यासाठी गेले आहेत. मात्र, मनसेने गृहीत धरु नये असे म्हटले आहे.

गोपिचंद पडळकर मतदानासाठी मुंबईत दाखल. पाचही जागेवर भाजपचे उमेदवार येणार असा दावा पडळकर यांनी केला. तसेच, पावसात कितीही भिजले तरीही निवडणुक जिंकणार नाही. पडळकरांचा राष्ट्रवादीला टोला. 161 आमदार युतीचे आहेत. चार तासात निकाल येईल. असंही पडकर म्हणाले.

विधानपरिषदेत मतदान करण्यासाठी रवी राणा हनुमार चालिसा घेऊन विधानभवनात दाखल. १०० टक्के शिवसेनेचे मतदार पडणार आहे. भाजपचे पाच उमेदवार निवडुण येणार. असा दावा त्यांनी यावेळी केला.

तसेच महाविकासआघाडीवर निशाणा साधत मतदान व्हाव यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. माझ्या घरी पोलिस पाठवण्यात आले. असा आरोप राणा यांनी केला.

अजित पवारांनी फोन केल्यानंतर मोहिते पाटील विधानभवनात दादांच्या भेटीला पोहोचले आहेत

भाजपाच्या ५० आमदारांनी मतदान केलं आहे. आत्तापर्यंत ६८ जणांचं मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले. मतदान बाकी असलेले आमदार - धनंजय मुंडे, सरोज अहिरे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते, छगन भुजबळ, सुमन पाटील, अशोक पवार

मतदानाला सुरुवात; १५ आमदारांनी नोंदवली मतं

मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या १५ मिनिटांत १५ आमदारांनी आपली मते नोंदवली आहेत. हरिभाऊ बागडे यांनी सर्वात आधी मतदान केलं आहे.तर आत्तापर्यंत भाजपाच्या आठ आमदारांनी मतदान केलं आहे. अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर हे काँग्रेसचे पोलिंग एजंट आहे.

राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत!

राष्ट्रवादीचे 3 आमदार अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते-पाटील, आशुतोष काळे अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेलाही हे तिघे उशिरा पोहोचणार असं चित्र आहे.

मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल; कॉंग्रेसने पहाटे दिला निर्वाणीचा इशारा

शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने रात्रभर चाललेल्या चर्चांनंतर दिला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट होताहेत काय असा थेट प्रश्नही कॉंग्रेसने केला आहे.विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सतत पुढे ढकलली जाते आहे.शक्य असूनही मते दिली जात नाहीत हा प्रकार आहे तरी काय अशी संतप्त विचारणा पहाटे पहाटे केली गेली.

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड सिद्धिविनायकाच्या चरणी

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते.

बविआचे आमदार क्षितीज ठाकूर अमेरिकेहून मुंबईत दाखल झाले आहेत. ते नालासोपारा मतदार संघाचे आमदार आहेत.

मुक्ता टिळक पुन्हा ऍम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना

निवडणुकीसाठी कसब्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाल्या पक्षाला गरज असल्यामुळे मी मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलंय, मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply