नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी 14 अधिकाऱ्यांची समिती

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १४ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहणार आहे. कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम मुख्यत्वे समितीकडे राहील.

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याला पाच वर्षांचा कार्यकाळ असला तरी प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. काही साधू- महंतांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन कुंभमेळ्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार गमे यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून माहिती मागविली. त्यात साधूग्रामसाठी संपादित क्षेत्र किती आहे व संपादित करावयाचे शिल्लक क्षेत्र तसेच भविष्यात आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून कशाप्रकारे नियोजन करण्यात आले, भाडे तत्त्वावर जागा घेतली जाणार आहे का, या संदर्भात माहिती मागविली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याच्यादेखील सूचना त्यांनी दिल्या. त्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

सीएसटी कुंभमेळा समन्वय असे कमिटीचे नाव असून, समन्वय अधिकारी म्हणून शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त समितीचे अध्यक्ष राहतील. कुंभमेळ्याची तयारी करताना विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम समन्वय अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाची पूर्वतयारी कामांचे आराखडे तयार करणे, अंमलबजावणी उपाययोजनांसाठी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे समितीमार्फत होतील.

अशी असेल समिती

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार समितीचे अध्यक्ष राहतील. अतिरिक्त आयुक्त शहर सुरेश खाडे समितीचे उपाध्यक्ष असतील.

त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, प्रशासन व अतिक्रमण उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, अधीक्षक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन संचालक, मिळकत व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समितीत समावेश राहील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply