नागपूर : ‘हिल स्टेशन’चा ‘फील’ उपराजधानी झाली गारेगार सकाळपासूनच शहरावर धुक्याची चादर पसरली

नागपूर : कालपासून नागपूरकरांना हुडहुडी भरली असून गुरुवारी दुसऱ्या दिवशीही २.१ अंशाने तापमानात घट झाल्याने नागपूरकरांना घरातही उब देणाऱ्या कपड्यांसह वावरावे लागले. शहरातील अनेक भागात दुपारीही शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब घेतली. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच शहरावर धुक्याची चादर पसरली होती. अनाहूतपणे आलेल्या धुक्यांमुळे नागपूरकरांना शहरातच ‘हिल स्टेशन’चा ‘फिल’ आला. आज शहरातील काही भागात कारंजे उडाल्याप्रमाणे हलके तुषार उडत असल्यासारखी

पावसाने हजेरी लावली. याचा वातावरणावर परिणाम होणार असून शनिवारपासून थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री शहराचे तापमान १७.२ असे नोंदविण्यात आले होते. आज पावसाळी वातावरण असल्याने तापमानात चांगलीच घट झाली. याशिवाय सकाळपासूनच धुक्यांनीही शहर व्यापले. त्यामुळे दिवसभर बोचरी थंडी, धुके यामुळे नागपूरकरांनी आज सिमला, उटी, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणांची अनुभूती घेतली.

आजच्या पावसाळी स्थितीचा थंडीवर परिणाम होणार आहे. मात्र, दोन दिवसांनंतर पावसाळी वातावरण दूर होऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २ ते ४ अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.

धुक्यामुळे अनेकांनी फुटाळा, अंबाझरी तलावावर फिरण्याचा आनंद लुटला. धुक्यात मॉर्निंग वॉकचा अनेकांनी आनंद लुटला. पावसाळी वातावरण व धुक्यामुळे आजही नागपूरकरांंना सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. एकूणच या वातावरणामुळे नागपूरकरांचा दिवस आल्हाददायक गेला. पावसाळी वातावरणामुळे दिवसाच्या कमाल तापमानात कमालीची घट होऊन उन्हच गायब झाले आहे.

२.१ अंशानी तापमानात घट

बुधवारच्या तापमानाशी तुलना केल्यास २.१ अंशानी गुरुवारी तापमानात घट झाली. आज १५.१ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे घर, कार्यालयांमध्ये उनी कपडे घालूनच नागरिक दिसले. थंडीमुळे अनेकांनी दुचाकीने प्रवास टाळून चारचाकी बाहेर काढली. त्यामुळे रस्त्यांवरही चारचाकी वाहनांची गर्दी दिसून आली. पानटपरी, चौकांमधील चहाटपरीच्या बाजूला अनेकांनी शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.

नागपूर उपराजधानीत गुरुवारी थंडीमुळे दिवसभर धुक्‍यांसह गारेगार वातावरण होते. यामुळे कधी नव्हे ते नागपूरकरांना ठेवणीतील उबदार कपडे, हातमोजे, कानटोपरे घालूनच कार्यस्थळी जावे लागले. दिवसभर आपण कुलू मनाली, शिमल्यात तर नाही ना असा भास होत होता. शहरातील फुटाळा तलावावरही धुक्याची चादर पसरली होती. काहींनी शेकोटी पेटवून थंडी पळवण्याचा प्रयत्न केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply