नवी दिल्ली: दिल्लीत इमारतीला भीषण आग, २७ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली:दिल्लीतील मुंडका परिसरातील व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २७ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. तर १०० हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अजूनही ३० ते ४० नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे. बचावकार्यासाठी साधारण १०० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. अग्निशमन दलाच्या पथकाकडून अद्याप तिसऱ्या मजल्यावर सर्च ऑपरेशन सुरू आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे २४ बंब घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले होते. 

इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या ९ जणांना संजय गांधी मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंडका परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

पीसीआर कॉलच्या माध्यमातून मिळाली घटनेची माहिती

शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ऑफिसात आग लागल्याच्या घटनेची माहिती मुंडका पोलीस ठाण्याच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मदतकार्य सुरू केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही जखमींना सुरुवातीला रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उड्या मारल्या. यात काही जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply