दापोली  : साहसी पर्यटनासाठी आलेला साताऱ्याचा एक जण समुद्रात बुडाला ; दापोली-कर्दे बीचवर बुडणाऱ्या पाच युवकांना वाचविण्यात यश

दापोली  : साहसी पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या साताऱ्यातील सहा महाविद्यालयीन युवकांपैकी एक जण कर्दे समुद्रकिनाऱ्यावर बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. सौरभ धाडवे असे या युवकाचे नाव असून त्याचा संध्याकाळपर्यंत शोध लागलेला नाही.

यश घाडगे (वय १९), अक्षय शेलार (वय १९), कार्तिक घाडगे (वय २०), दिनेश चव्हाण (वय २०), कुणाल घाडगे (वय ३०, सर्व रा. वाई, सातारा) आणि सौरभ धावडे (वय १८, रा. पाचगणी) हे सहा मित्र मोटरसायकलवरून दापोलीत साहसी पर्यटन करायला आले होते.

साताऱ्यातून शनिवारी रात्री निघालेल्या या युवकांनी खेडमधील पेट्रोल पंपावर मध्यरात्री झोप घेतली आणि पुढे सकाळी ते हर्णे बंदरावर आले. बंदराजवळच्या किल्ल्यांवर फिरल्यानंतर त्यांनी बारा वाजता कर्दे समुद्रकिनारा गाठला. किनाऱ्यावर त्यांनी स्वत:बरोबर आणलेला तंबू उभारून त्यात कपडे बदलले.

त्यानंतर तंबूत स्वत:चे साहित्य ठेवून ते पोहायला समुद्रात उतरले. तोपर्यंत समुद्राला ओहोटी सुरू झाली होती. पौर्णिमा असल्याने पृष्ठभागाखालील पाण्याला वेग अधिक होता.

काही मिनिटांतच त्यांचा पाण्याचा अंदाज चुकत गेल्याने आपण समुद्रात ओढले जात असल्याचे सर्वाच्या लक्षात आले. तसे या युवकांनी आरडाओरड सुरू केली. किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये बसलेल्या ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांना त्यांची आरडाओरड ऐकायला आली. प्

पर्यटन हंगाम सुरू झालेला नसल्याने समुद्रात फिरायला नेणाऱ्या मोटार बोटी सध्या बंद आहेत. त्यामुळे नरवणकर व तोडणकर यांनी दोरी घेऊन समुद्राकडे धाव घेतली. नीट उभे राहता येईल एवढय़ा पाण्यात जात त्यांनी लगबगीने दोरी समुद्रात फेकली आणि त्याच्या साह्याने पाच जणांना बाहेर ओढून काढले; पण सौरभ धावडेने दुसऱ्याचा पकडलेला हात सुटल्याने समुद्राच्या पाण्याने त्याला आत ओढून घेतले आणि काही क्षणात तो दिसेनासा झाला.

संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थ त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते; पण तो सापडला नाही.

दरम्यान, दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांवर सातारा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. गाडय़ा बेदरकारपणे चालविणे, अव्यवस्थित पार्किंग करून वाहतूक कोंडी करणे, परवानगी नसतानाही बीचवरील वाळूत गाडय़ा फिरविणे, यासाठी हे पर्यटक संपूर्ण दापोलीकरांच्या टीकेचे लक्ष्य होत असतात.

याबाबत स्थानिकांनी समज देऊनही हे पर्यटक काही ऐकत नाहीत. काही प्रसंगांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर कोणाच्याही जीवितास धोका निर्माण होणार नाही, असे वागण्यास पर्यटकांना प्रवृत्त करता यावे, यासाठी येथील किनाऱ्यांवर पोलीस गस्तीची मागणी होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply