जम्मू-काश्मीर: PM मोदींच्या रॅलीच्या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर स्फोट

जम्मू-काश्मीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमधील साबा जिल्ह्यातील पल्ली गावात राष्ट्रीय पंचायती राज दिनाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यापुर्वी शेतात स्फोट झाला. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण आज होणाऱ्या रॅलीच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किमी अंतरावर आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. जम्मूतील बिश्नाह येथील ललियाना गावात स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात वीज पडण्याची किंवा उल्का पडल्याचाही संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीएम मोदींच्या या कार्यक्रमासाठी जम्मू शहरापासून १७ किमी अंतरावर असलेल्या पल्ली पंचायतीला पोलीस छावनीचे रुप आले आहे.

या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह (CRPF) स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक सभेच्या ठिकाणी ३०,००० पंचायत सदस्यांसह एक लाखाहून अधिक लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, शनिवारी, संयुक्त सुरक्षा पथके बारी ब्राह्मण ते पल्ली चौक या महामार्गालगतच्या संपूर्ण भागात गस्त घालताना दिसल्या, जिथे पंतप्रधानांच्या स्वागताचे मोठ्या होर्डिंग्जने सजवले गेले होते.

दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी घटनास्थळ, जिल्हा मुख्यालय आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांकडे जाणाऱ्या विविध ठिकाणी अतिरिक्त संयुक्त सुरक्षा चौक्या उभारण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेव्यतिरिक्त, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही उच्च-स्तरीय पाळत ठेवणारी उपकरणे सुरक्षा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ट्रॅफिक पोलीस जम्मूने पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात आधीच एक नोटीस जारी केली आहे आणि लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी काही निर्बंध आणि विशेष मार्ग योजना जाहीर केल्या आहेत.

पंतप्रधान आज सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय पंचायती राज दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. देशभरातील सर्व ग्रामसभांना मोदी थेट जम्मू काश्मीरमधून संबोधित करणार आहेत. या संबोधनादरम्यान, पंतप्रधान सुमारे २०,००० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान अमृत सरोवर उपक्रमाचा शुभारंभही करणार आहेत. यानंतर सायंकाळी ५ वाजता ते मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत, जिथे त्यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply