गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, मला आधी हे स्पष्ट करायचं आहे की, माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय?

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. पण गिरीश महाजनांवर खरंच असा गुन्हा दाखल केला आहे का? याबाबतचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी स्वत: दिलं आहे. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय का? याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले, “मला आधी हे स्पष्ट करायचं आहे की, माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय? याबाबत मला कोणतीही माहिती नाहीये. पण पेनड्राइव्ह प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बिहार किंवा उत्तर प्रदेश पोलिसांनाही लाजवेल, अशाप्रकारे षडयंत्र करून माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मी मोबाइलवरून कुणाला तरी तीन वर्षे १२ दिवसांपूर्वी धमकी दिली होती, त्यानंतर तीन वर्षे १२ दिवसांनी माझ्याविरोधात एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.”

“तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीनी मला सांगितलं की, हा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर किती दबाव आहे. हा गुन्हा दाखल करावा, म्हणून खडसे किती वेळा फोन करतात? हेही त्यांनी मला सांगितलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांवरही दबाव होता, हेही त्यांनी मला सांगितलं. अशा प्रकारे त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. या खोट्या गुन्ह्यानंतर माझ्यावर मोकाअंतर्गत कारवाईचा आदेशही देण्यात आला होता. पण मी उच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो. जिथे मला दिलासा मिळाला. पण हे सर्व षडयंत्र सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचलं होतं” असा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीसांनी संबंधित पेनड्राइव्ह विधान सभेत ठेवला आहे. ज्यामध्ये माझ्यावर केसेस कशा दाखल केल्या? गिरीश महाजनांना कसं फसवलं? गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे? ह्या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण त्यामध्ये झालं होतं. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवासांनी विधानसभेत केली होती. सीबीआय चौकशी करावी, ही आमची मागणी होती. पण तत्कालीन सरकारने संबंधित प्रकरणावरून सरकारी वकील रवींद्र चव्हाण यांना हटवलं आणि सीआयडी चौकशी सुरू केली.”

आता सरकार बदलल्यानंतर आम्ही न्यायालयात गेलो. त्यानंतर सीबीआय चौकशीची आमची मागणी मान्य झाली. आता याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. पेनड्राइव्हमधील माहिती खरी आहे की खोटी? यासाठी फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर सीबीआय चौकशीत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी अनेक बड्या नेत्यांची नावं घेतली आहेत, असा दावा महाजनांनी केला आहे. सीबीआयच्या चौकशीनंतर सर्व बाबी स्पष्ट होतील. या प्रकरणात कोण-कोण सहभागी होतं? कुणी कुणाला सूचना दिल्या होत्या? ते कुणाला भेटायचे? सीबीआय चौकशीअंती सर्व बाबी स्पष्ट होतील. यामध्ये प्रवीण चव्हाण नक्की दोषी ठरतील आणि त्यांना याची शिक्षा भोगावी लागेल, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply