कोल्हापूर पोट निवडणुकीत ‘मविआ’चा डंका, जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

कोल्हापूर: राज्यात अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक राज्यातील सर्वच मातब्बर नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. आज त्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९२०१२ एवढी मतं पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केलाय.

भाजपने या जागेवर आपणच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु भाजपला धक्का बसला आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोट निवडणूक लागली होती. त्यात महाविकास आघाडीकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आता त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयाने जाधव कुटुंबातील वातावरण भावूक झाले आहे.

दरम्यान भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणुक बिनविरोध होत असते अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे परंतु इथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply