कोर्टाचा मलिकांना पुन्हा दणका! कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या २३ फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी  नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यांना सकाळीच ईडी कार्यालयात दाखल करण्यात आले. आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या हस्तकाकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांच्या कोठडीत तीनदा वाढ केली असून आता देखील त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपणार होती. पण, न्यायालयाने परत एकदा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे. यावेळी मलिकांना तुरुंगात बेड, गादी आणि खुर्ची पुरविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. मलिकांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच जामीन देण्याची मागणी केली होती. ईडीने सूडबुद्धीने कारवाई केल्याचं मलिकांनी म्हटलं होतं. ज्या प्रकरणात ईडीने कारवाई केली त्यावेळी हा कायदाच तयार झालेला नव्हता, असा युक्तीवाद मलिकांच्या वकिलांनी केला होता. मलिकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना बेकायदेशीर अटक केली असं वकिलांनी म्हटलं होतं. पण, न्यायालयाने मलिकांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली होती.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply