कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान; श्री रेणुका देवीची रंगपंचमीला यात्रा

सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा प्रथेप्रमाणे रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता. २२) भरत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी यात्रा भरणार आहे. यात्रा सोमवार (ता. २१) पासून सुरू होणार असून मुख्य दिवस मंगळवारी (ता. २२) आहे. बुधवारी (ता. २३) यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी यात्रेची तयारी अगोदरपासूनच केली आहे. पाहुण्यांसह माहेरवाशिणीना आमंत्रण दिले आहे.सौंदलगा हे सीमावर्ती गाव असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी येतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कौलव, कुर्डू, घोटवडे भागातील भाविक बैलगाड्याना सवारी जोडून मोठ्या प्रमाणात येतात. यावर्षी सोमवारीच या बैलगाड्यांचे आगमन होणार आहे. खेळणी, मिठाईवाले, नारळ विक्रेते, हॉटेल, आईसक्रीमचे गाडे येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे व श्री रेणुका देवीचा वार असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. या यात्रेचा मान पाटील (गलगले) या परिवाराकडे असून यात्रेच्या मुख्य दिवशी मंगळवारी पहाटे दंडवताचा कार्यक्रम होत आहे. दंडवत झाल्यानंतर लिंब नेसण्याचा कार्यक्रम आहे. बैलगाडीतून आलेले भाविक आपल्या बैलांनाही लिंब नेसवतात. त्याबरोबरच सकाळी श्री रेणुकादेवीस महाअभिषेक घालून महापूजा केली जाते. या पूजेचा मान पाटील (गलगले) यांच्याकडे आहे. दुपारी १२ वाजता रेणुका मंदिरातील कोतवालास सबिना घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली जाते. त्यानंतर आरती होऊन नैवेद्य दाखवला जातो. तसेच भक्त मंडळाकडून रात्री देवीच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेत निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत यात्रेकरूंना आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्याबरोबरच ग्रामपंचायतीकडूननही यात्रेची तयारी केली आहे. यात्रेत भाविक-भक्तांनी कोविड प्रतिबंधक नियम पाळावेत, असे यात्रा कमिटी व पाटील (गलगले) परिवाराकडून कळविण्यात आले आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *