औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात पहिल्यांदाच बेशुध्द न करता दोघांवर यशस्वी ‘हृदय शस्त्रक्रिया’

औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात पहिल्यांदाच दोन रुग्णांवर बेशुध्द न करता यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती हृदयरोग शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. योगेश बेलापूरकर, हृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. नागेश जंबुरे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात एका ७५ वर्षीय रुग्णावर आणि ३३ वर्षीय महिला रुग्णावर एमजीएम रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. ७५ वर्षीय रुग्णास मधुमेह, रक्तदाब आणि अतिधूम्रपानामुळे फुप्फुसाचा आजार होता. रुग्णाची अँजिओप्लास्टी झालेली होती. आता पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये गाठी आढळल्या होत्या.

तर महिला रुग्णास जन्मत: हृदयातील छिद्रामुळे फुप्फुसावर दाब वाढला होता. फुप्फुसाचा आजार असेल तर हृदय शस्त्रक्रिया करताना पूर्णपणे भूल दिल्यास जोखीम वाढते. त्यामुळे पाठीच्या कण्यात ठरावीक मज्जारज्जूंवर भुलीचे इंजेक्शन देऊन या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकारच्या भुलीत रुग्ण पूर्णपणे जागे होते. स्वत: श्वास घेत होते, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. बेलापूरकर, डॉ. जंबुरे यांच्यासह डॉ. सुहृद अन्नछत्रे, डॉ. अजिता अन्नछत्रे, डॉ. रीम रॉय, डॉ. प्रदीप बिसेन, डॉ. जुबेर खान, डॉ. विजय व्यवहारे, योगेश चव्हाण, अनिल माळशिखरे, अपेक्षा कोठावदे, वैशाली राऊत आदींनी शस्त्रक्रियेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply