एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द, तातडीने दिल्लीला रवाना

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे आणखी संभ्रम वाढला आहे.

एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यासोबत तब्बल १३ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. ते दिल्लीला का गेले आहेत. त्याची कारणं काय आहेत? याबाबत नक्की माहिती मिळू शकलेली नाही.

देवेंद्र फडणवीस नाशिकमधील योगदिनानिमित्त एका कार्यक्रात भाग घेणार होते. योगदिनाच्या कार्यक्रमाला अमित शाहदेखील येणार होते. तसेच ते एका कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमातही सहभागी होणार होते. मात्र रात्री मतमोजणीला उशीर झाल्यामुळे फडणीस यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर आता फडणवीस यांनी थेट दिल्ली गाठली असून ते येथे कोणाला भेटणार तसेच कोणत्या विषयावर चर्चा करणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

दरम्यान, शिंदेंना शिवसेनेकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदेशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या फोनवर कॉल केल्यावर गुजराती भाषेमध्ये मोबाईल सेवेची ट्यून ऐकू येत असल्याने ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली असून काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्तांकन केलं आहे. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असलेल्या गुजरातमधील ला मेरिडीअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply