उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक : दिल्लीत हालचाली वाढल्या, विरोधी पक्षांचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल; संजय राऊतही हजर!

देशात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने आपला उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश, डी. राजा, टी. आर. बालू, रामगोपाल यादव, सीताराम येच्युरी इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीत विरोधी पक्ष राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत आपली रणनीती निश्चित करणार आहे. भाजपाला शह देण्यासाठी हे सर्व नेते चर्चा करतील आणि मग सर्वसहमतीने निर्णय घेण्यात येणार आहे.

जगदीश धनखड भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड हे भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर शनिवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड यांच्या उमेदवारीची  घोषणा केली. ‘‘उपराष्ट्रपती पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली, पण ‘शेतकरीपुत्र’ धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले,’’ असे नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धनखड यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार म्हणून धनखड यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा रंगली होती, मात्र देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने धनखड यांची निवड योग्य असल्याचे नड्डा म्हणाले.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये धनखड यांना पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते सातत्याने वादात राहिले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी विविध राजकीय व प्रशासकीय मुद्दय़ांवरून तीव्र मतभेद झाले. बॅनर्जी यांनी धनखड यांच्यावर हवाला प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला होता व त्यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली होती. मात्र, ममतांच्या आक्रमक भूमिकांना धनखड प्रत्युत्तर देत असल्याने केंद्र सरकारने त्यांच्या कारभारात कोणतीही दखल दिली नसल्याचे मानले गेले. ‘‘मी संघाशी निगडित नाही. पण संघाशी माझे संबंध जोडले गेले तर मला आनंद होईल आणि हे सांगण्यात मला काहीच संकोच वाटत नाही,’’ असे धनखड यांनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.

कोण आहेत जगदीश धनखड?

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले धनखड तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहिले आहेत. राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील दुर्गम गावातून आलेले धनखड राजस्थान उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयातील यशस्वी वकील होते. त्यानंतर १९८९ मध्ये धनखड जनता दलाच्या तिकिटावर झुनझुनू लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री पदही सांभाळले. १९९३ मध्ये राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य बनले. २०१९ मध्ये मोदी सरकारने त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवले.    

लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीची निवड करतात. लोकसभेत भाजपकडे पूर्ण बहुमत असून राज्यसभेत ‘एनडीए’तील घटक पक्ष तसेच बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांच्या मदतीने धनखड विजयी होऊ शकतात. १९ जुलै, मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असून ६ ऑगस्ट रोजी मतदान होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply