उड्डाण पुलाच्या हाईट बॅरिगेटला धडकून एसटीला अपघात; महिला प्रवासी गंभीर जखमी

पुणे - जामखेड-पुणे एसटी बस हडपसर उड्डाण पुलाला लावलेल्या हाईट बॅरिगेटला (Height Barrier) धडकून आज (सोमवार, दि. 18 एप्रिल 2022) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक महिला प्रवासी गंभीर, तर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाली झाले. एस.टी. बसचे मोठे नुकसान झाले आहे. सूचना फलक नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी लातूर-पुणे, सोलापूर-पुणे हाईट बॅरिगेटला धडकून अपघात झाला.

माजी नगरसेवक मारुती तुपे म्हणाले की, उड्डाण पुलावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामध्ये एसटीचाही समावेश होत आहे. प्रशासनाने 200 मीटर अंतरावर सूचनाफलक लावणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उल्हास तुपे म्हणाले की, पालिका प्रशासनाने हडपसर उड्डाण पुलावरील बॅरिगेटविषयी नामफलक लावला नाही, त्यामुळे वाहनांना अपघात होत आहे. वाहनचालक म्हणाले की, हडपसर उड्डाण पुलाचे हाईट बॅरिगेट म्हणजे यमनगरीच आहे. पालिका प्रशासनाने हाईट बॅरिगेट आणि गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने टाकल्यामुळे अपघाताची मालिका सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका अधिकाऱ्यांनी हाईट बॅरिगेटला स्टीकर लावून काम केल्याचा दिखावा केला. मात्र, त्या ठिकाणी बॅरिगेटविषयी कुठेही सूचना नसल्याने वाहनांना अपघात होत आहे. तरीसुद्धा पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने का पाहात नाही, असा सवाल जीवन जाधव यांनी उपस्थित केला.

बस हाईट बॅरिगेटला अडकल्यामुळे चालक आणि प्रवाशांसाठीचा दरवाजा बंद झाला. नागरिकांनी तातडीने काचा फोडल्या आणि बार टाकून दरवाजा उघडला. बसमध्ये 36 प्रवासी होते. अपघातानंतर प्रवासी घाबसल्याने जखमी अवस्थेत निघून गेले. गंभीर जखमी झालेल्या महिलेचे दात पडले होते, तिच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केले.

एस.टी. बसचालक संभाजी गायकवाड म्हणाले की, पाच महिन्यानंतर या मार्गावर पहिल्यांदाच आलो. हडपसर उड्डाण पुल बंद असल्याची माहिती नव्हती, तसा कुठेही फलक नाही आणि सायंकाळी सहाच्या सुमारास डोळ्यावर सूर्यकिरण चमकत होती, त्यामुळे हाईट बॅरिगेटचा अंदाज आला नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply