आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; गुवाहाटीतून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आसामच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी आसाममधून मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळे असून ही दोन राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन' उभारण्यात येणार आहे.

आसाममध्येसेवा बजाव णाऱ्या मराठीभाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी मिळून सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने आसाममध्ये सांस्कृतिक भवन उभारावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.

गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.

आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रातून येतात. त्यांना सोयी सुविधा पुरवणे, महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना लागेल ती मदत उपलब्ध करून देणे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून शक्य ते सारे प्रयत्न केले जातात.

या मंडळातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी काही वर्षे आसाम राज्यात सेवा बजावल्यानंतर या दोन्ही राज्यामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या अनेक साम्यस्थळे असल्याचे जाणवल्याने या दोन्ही राज्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जवळ आणण्याची गरज जाणवू लागल्याचं सांगितले.

राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार गुवाहाटी येथे काही दिवस राहण्यासाठी आले. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले, त्यावेळी केलेला नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपले मंत्री, आमदार, खासदार यांना घेऊन गुवाहाटीला आले. त्यामुळे हेच औचित्य साधून या मंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये आसाममध्ये कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र भवन बांधावे आणि दोन राज्य सांस्कृतिक दृष्ट्या जवळ यावी यासाठी सांस्कृतिक भवन बांधावे अशी मागणी करण्यात आली. 

आपल्या राज्याला असलेली भक्तीमार्गाची मोठी परंपरा आसामच्या संस्कृतीमध्ये देखील रुजलेली आहे. आपल्याला असलेली वीररसाची परंपराही आसाम राज्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वर्षे आधी आसाममधील लसीत बार फुकान यांनी देखील मुघलांच्या विरोधात लढा दिला होता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्फूर्तीस्थान मानणारा मोठा वर्ग आसाममध्ये आहे. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठी आणि असामी भाषेत देखील अनेक शब्द समान आहेत कारण मराठीप्रमाणे आसामीमध्ये देखील आईला 'आई'च म्हंटले जाते. कदाचित दोन भारतीय भाषांमध्ये केवळ याच दोन भाषांमध्ये हे साम्य असावे. याशिवाय साहित्य, कला, संस्कृती, जडणघडण यात अनेक साम्य आहेत, त्यामुळे या दोन राज्यांना जोडणारे सांस्कृतिक भवन आसाममध्ये उभारावे अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीसाठी सकारात्मकता दाखवताना ही दोन राज्ये एकमेकांच्या अधिक जवळ यावीत तसेच सांस्कृतिक दृष्टीने जोडली जावीत यासाठी नक्की काय करता येईल ते नक्की करू अशी ग्वाही दिली.

तसेच या मंडळाने केलेल्या मागणीनुसार आसाममध्ये महाराष्ट्र भवन सांस्कृतिक भवन आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिरही उभारण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच आसाममधील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र आणि आसाम मधील लोकसंस्कृती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग, राज्यातील संतांबद्दलची माहिती याचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

तसेच या कामासाठी राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांची विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती देखील करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच आसाम आणि महाराष्ट्र यांच्यातील औद्योगिक संबंध वाढावे यासाठी मंत्री उदय सामंत हेदेखील प्रयत्न करतील असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला मुख्यमंत्री आणि बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे आणि आसाममधील छत्रपती शिवाजी मंडळाचे सदस्य असलेले सर्व राज्यपत्रित अधिकारी उपस्थित होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply