आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिला संघाचे विजयी सलामीचे ध्येय!; आज महिला आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेचे आव्हान

पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ धावबादाचा विवाद मागे टाकत महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचा सलामीचा सामना शनिवारी श्रीलंकेशी होणार आहे.

भारतीय महिला संघाला नजीकच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २००४ पासून सुरू झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने गेले पर्व सोडल्यास प्रत्येक पर्वात जेतेपद मिळवले आहे. भारताने एकदिवसीय प्रकारात चार, तर ट्वेन्टी-२० प्रकारात दोन जेतेपदे पटकावली आहेत. २०१२ पासून आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकारात खेळवली जात आहे. २०१८च्या स्पर्धेत भारताने बांगलादेशकडून हार पत्करली. आता करोनामुळे चार वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल.

बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्यानंतर या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-२ अशी हार पत्करली. मात्र, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली या संघाने एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताकडून हरमनप्रीत आणि स्मृती मानधना चांगली फलंदाजी करत आहेत. शफाली वर्मा, सबिनेनी मेघना आणि दयालन हेमलताकडून भारताला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. जेमिमा रॉड्रिग्जचे पुनरागमन झाल्याने भारताच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा रेणुका सिंग सांभाळेल, तर फिरकीची मदार राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांच्यावर असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ कर्णधार चमारी अटापट्टूवर अवलंबून आहे. हसीनी परेरा आणि हर्षिता समरविक्रमाकडून चमारीला साथीची अपेक्षा असेल. 

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नॉन-स्ट्राईकवरील चार्ली डीनला धावबाद करणे हा भारतीय संघाच्या योजनेचा भाग नव्हता, पण तिला नियमानुसारच धावबाद केल्याचे स्पष्टीकरण भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिले.  आशिया चषक स्पर्धेपूर्वी दीप्तीचे समर्थन करताना हरमनप्रीत म्हणाली, ‘‘गेल्या काही सामन्यांपासून आम्ही या बाबींवर लक्ष देत आहोत. डीन क्रीजच्या पुढे जात होती आणि दीप्तीने जागरूकता दाखवीत तिला धावबाद केले.तुम्ही मैदानावर असता तेव्हा प्रत्येकाला जिंकायचे असते. मात्र, नियमांनुसार खेळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने फलंदाजाला धावबाद करणे हे नियमांतर्गतच आहे.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply