अमरावती पदवीधर मतदार संघात मतमोजणी सुरू, निकालाची उत्‍कंठा

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने  निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. मतमोजणीला बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासह २३ उमेदवारांच्‍या भाग्‍याचा फैसला आज होणार आहे.

या निवडणुकीसाठी गेल्‍या ३० जानेवारीला मतदान झाले होते. एकूण ४९.६७ टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. विधान परिषदेच्या या जागांसाठी पसंतीक्रमाने मतदान करण्यात येते. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्‍यास निकालाला विलंब होण्‍याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीसाठी २८ टेबलांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण २८ पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

पदवीधर मतदार संघात एकूण २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंदणी झाली होती. मतदान केवळ ४९.६७ टक्‍के इतके झाले. मतदानाचा घसरलेला टक्‍का कुणासाठी फायदेशीर ठरणार याची चर्चा सध्‍या रंगली आहे. उमेदवारांची आपापल्‍या गृहजिल्‍ह्यांमध्‍ये शक्‍ती दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रभावी अपक्ष उमेदवारांमध्‍ये होणारी मतविभागणी, शिक्षक आणि कर्मचारी संघटनांच्‍या भूमिका याचा परिणाम निकालावर जाणवणार असून निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply