अपंगांसाठी लवकरच स्वतंत्र विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधील आहे. त्यामुळेच राज्यात अपंगांसाठी नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

येथील बालेवाडी क्रीडा संकुलात अपंग मुला-मुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभात पाटील बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. पाटील म्हणाले, की शासनाने स्वतंत्र अपंग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे. अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करून त्यांचा सर्वागीण विकास करण्यात येईल. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातून अपंगही कुठे कमी नाहीत, असा संदेश समाजासमोर आला आहे. त्यामुळे अपंग मुलामुलींचे मनोबल वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

अपंगांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धामुळे अपंगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच नवीन अनुभूती त्यांना मिळाली आहे. ही अनुभूती त्यांच्या जीवनात कायम राहील. अशा स्पर्धातून खेळाडू तयार होऊन राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील. भविष्यात दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे पवार म्हणाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपंग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्हा अव्वल

तीन दिवस झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले. मूकबधिर, कर्णबधिर आणि बहुविकलांग या तीन प्रवर्गात विजेता संघ म्हणून नागपूर जिल्ह्याला तीन चषक प्रदान करण्यात आले. अंध प्रवर्गात अमरावती, अस्थिव्यंग प्रवर्गात उस्मानाबाद, मतिमंद प्रवर्गात मुंबई उपनगर जिल्ह्याने विजेतेपद मिळवले. अंध ,मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गात पुणे जिल्हा, बहुविकलांग प्रवर्गात लातूर जिल्हा उपविजेता ठरला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply