अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तयारीसाठी संधी मिळणार का?

औरंगाबाद : अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेश यंत्रणेचा दरवर्षी गोंधळ उडतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश रखडल्याने प्रवेश फेऱ्या वाढवाव्या लागतात. दरवर्षी दहावीतून अकरावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाबाबतचा गोंधळ कमी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन प्रवेशाची मार्च-एप्रिल महिन्यात तयारी करून घेतली जाते. परंतु, कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून तयारी करता आली नाही. यावर्षी अकरावी प्रवेशाबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे यंदा चौथे वर्ष आहे. दरवर्षी प्रवेशासाठी नवीन पालक, विद्यार्थी असतात. यामुळे प्रवेशातील माहिती व सराव होण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरवातीला महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, मागील दोन वर्ष कोरोनामुळे शैक्षणिक सत्रच विस्कळित झाले होते. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरु झाली. मागील वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने परंतु, उशिराने घेण्यात आली अन् उशिराच संपली. यंदा दहावीच्या परीक्षा ऑफलाईन सुरु आहेत. या परीक्षा एप्रिलमध्ये संपणार आहेत. परीक्षा संपल्यावर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुकर होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज सरावासाठी उपलब्ध केले जाणार का? असे प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश राबविताना विद्यार्थी पालकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? या अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक महिना अगोदर ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशीही मागणी पालकांनी केली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply