शिलॉंग : १८ वर्षीय टेबल टेनिसपटू स्पर्धेसाठी घरातून निघाला तो कायमचाच! अपघातात निधन, मोदींकडून शोक व्यक्त

शिलॉंग : तामिळनाडूमधील एका युवा टेबल टेनिसपटूचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी झालेल्या अपघातात या १८ वर्षीय विश्व दीनदयालन या खेळाडूचा मृत्यू झाला असून तो आंतरराज्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी शिलॉंग येथे जात होता. त्यादरम्यान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसून या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या माहितीनुसार या अपघातात विश्व हा आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत ८३ व्या सिनिअर राष्ट्रीय आणि आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी गुवाहटीवरुन शिलॉंगला जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या वाहनाला रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येत असलेल्या वाहनाने धडक दिली आणि ते वाहन खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी विश्व दीनदयाळ याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

या अपघातात रमेश संतोष कुमार, आविनाश प्रसन्ना श्रीनिवासन आणि किशोर कुमार हे खेळाडूसुद्धा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान घरापासून दूर गेलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दीनदयालन या नवोदित खेळाडूने अनेक पुरस्कार जिंकले असून २७ एप्रिलला ऑस्ट्रियामध्ये होणाऱ्या WTT युवा चॅम्पियनशिपमध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करणार होता. विश्वचे कुटुंबीय आज गुवाहटीनरुन मृतदेह चेन्नई येथे त्यांच्या घरी नेणार असल्याची माहिती आहे. मेघालय टेबल टेनिस असोसिएशनचे अधिकारी आणि तेथील जिल्हा प्रशासन अधिकृतरित्या या प्रकरणाची देखरेख करुन विश्वच्या कुटुंबीयांकडे मृतदेह सुपूर्द करणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply