राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे निकाल : आज मतमोजणी; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती

राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे निकाल : देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदी विराजमान होणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

मुर्मू विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील. मूळच्या ओदिशाच्या असलेल्या मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहेत. प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. आपल्या निवडीमुळे आदिवासी समाजाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

मूर्मू यांना पाठिंबा अधिक
निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून मुर्मू यांना ७० टक्क्यांहून अधिक मतं मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला. त्यामुळेच मुर्मू यांना किती मतं मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विविध पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे ५० टक्क्यांच्या आसपास मते होती. पण, आदिवासी समाजातील महिला उमेदवार म्हणून विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. १० लाख, ८६ हजार, ४३१ एकूण मत मूल्यांपैकी मुर्मू यांना साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतमूल्य मिळेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आला होता.

विरोधी आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेने आदिवासी समाजातील उमेदवार या मुद्द्यांवर भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य कमी झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आदींनी सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता.

१० राज्यांमध्ये १०० टक्के मतदान
राष्ट्रपतीपदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या दहा राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

…म्हणून महाराष्ट्रात १०० टक्के मतदान नाही
महाराष्ट्रात विधानभवन येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आजारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान केले नाही. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असल्या तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाल्याने सध्याचे संख्याबळ २८७ आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply