यंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद

पुणे : मोसमी पावसाच्या चार महिन्याच्या हंगामामध्ये पुणे शहरात साडेआठशे मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. यंदा शहरात सरासरीच्या तुलनेत सुमारे २०० मिलिमीटर अधिक पाऊस नोंदिवला गेला आहे. शहराच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक, तर पूर्व भागात ते कमी असल्याचे दिसून आले. पुणे जिल्ह्यात यंदाही पावसाने सरासरी ओलांडली असून, मुळशी, बेल्हे तालुक्यांना मागे टाकत मावळ तालुक्याने पावसात आघाडी घेतली. या तालुक्यात चार महिन्याच्या हंगामात तब्बल २८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये यंदा पूर्वमोसमी पावसाने पाठ फिरविली होती. १० जूनला तळकोकणातून मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. १५ जूनला त्याने संपूर्ण राज्य व्यापले. १२ ते १३ जूनच्या सुमारास पुणे शहर आणि जिल्हा मोसमी पावसाने व्यापला.

मात्र, संपूर्ण जूनमध्ये एकूणच राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पुणे शहरात ११ जूनला २५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. हा दिवस वगळता शहरात जूनमध्ये मोठा पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता निर्माण झाली होती.जुलै आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचे चित्र एकदमच पालटले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला. ६ ते १५ जुलैला शहरात मुसळधार पावसाची हजेरी होती. महिन्याच्या अखेरीला २८ जुलैलाही पावसाने तडाखा दिला. जुलैनंतर ऑगस्टमध्ये पावसाने जोर धरला. ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत संतताधर पाऊस शहरात होता. याच कालावधीत शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरून विसर्गही करण्यात आला.

हंगामाच्या शेवटच्या महिन्यात सप्टेंबरमध्येही कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहिला. ८, १२, १६, १७ सप्टेंबरला चांगल्या पावसाची नोंद झाली. महिनाआखेर तर मुसळधार पाऊस झाला. परिणामी पुणे शहरात हंगामात साडेआठशे मिलिमीटरहून अधिकचा पाऊस नोंदविला गेला. शहराच्या मध्यवर्ती शिवाजीनगर भागातील हा पाऊस सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात अधिक होता. त्यापूर्वी हंगामात सर्वाधिक पाऊस पश्चिम भागात पाषण परिसरात नोंदिवला गेला. शहराच्या पूर्व भागातील लोहगाव परिसरात मात्र पावसाचे प्रमाण शहराच्या इतर भागांच्या तुलनेत कमी होते.

पुणे जिल्ह्यामध्ये यंदा मावळ तालुक्यात सर्वाधिक २८०० मिलिमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली. त्यातील सर्वाधीिक पाऊस लोणावळा आणि खंडाळ्यातील घाट विभागात झाला. मावळपाठोपाठ वेल्हे तालुक्यात २५०० मिलिमीटर, मुळशी तालुक्यात सुमारे २३०० मिलिमीटर, जुन्नर तालुक्यात १३०० मिलिमीटर, तर भोर तालुक्यात १२०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंबेगाव तालुक्यातही एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली, शिरूर, खेड आदी तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply