मुंबई : राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची भोंग्याच्या मुद्द्यावर बैठकही झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर आल्या होत्या. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मनसैनिकांशी चर्चाही केल्याचं समजते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी (Mumbai police) मोठा फौजफाटा तैनात केला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर मोठी गर्दी केलीय.

राज ठाकरे यांच्यासह सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply