मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी, नमन आणि डीएलएफच्या निविदा सादर; नव्या वर्षात निविदा अंतिम होण्याची शक्यता

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी शेवटच्या दिवशी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून अदानी, नमन आणि डीएलएफ या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. लवकरच या निविदांची छाननी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. एकूणच निविदा प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी आणखी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे.
आशियातील सर्वात मोठ्या, ५५७ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसलेल्या धारावीचा पुनर्विकास राज्य सरकारने २००४ मध्ये हाती घेतला आहे. यासाठी २००९ मध्ये निविदा मागविण्यात आली होती.

मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने २०११ मध्ये निविदा रद्द करण्यात आली. पुढे २०१६ मध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आणि तीही रद्द करण्यात आली. त्यानंतर २०१८ मध्ये तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. या निविदेला दोन बड्या विकासकांनी प्रतिसाद दिला होता. मात्र निविदा अंतिम होण्याच्या टप्प्यात असताना ऑक्टोबर २०२० मध्ये निविदा रद्द करण्यात आली. तीन वेळा निविदा रद्द करण्यात आल्यानंतर आता चौथ्यांदा निविदा काढण्यात आल्या असून याला तीन कपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

निविदा सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. या निविदा बुधवारी उघडण्यात आल्या असून अदानी, नमन आणि डीएलएफ या तीन कंपन्यांनी निविदा भरल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डिआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. आता या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून निविदा अंतिम करण्यात येतील. मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply