मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३१.७४ टक्के मतदान ; मतमोजणी रविवारी

 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी, ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले. सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी, ६ नोव्हेंबरला होणार आहे.  ऋतुजा लटके या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार आहेत.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

मतदानादरम्यान आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर, वैद्यकीय किट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी सोयी सुविधांचा समावेश होता. या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी साधारणपणे १ हजार ६०० अधिकारी, कर्मचारी, १ हजार १०० मुंबई पोलीस दल व इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. याव्यतिरिक्त ७० सूक्ष्म निरीक्षक देखील कर्तव्यावर होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply