मुंबईत बेस्टची डिजिटल बससेवा सुरु; टॅप इन-आऊट करुन मिळणार तिकिट

मुंबई: बेस्ट उपक्रमाने मुंबईमध्ये १०० टक्के डिजिटल बसगाड्या सुरु करण्याची घोषणा केली असून या बसगाड्यांमधून प्रवाशांना संपूर्ण डिजिटल सेवा अनुभवता येणार आहे. यामध्ये प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर "टॅप इन" करुन आणि बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन आपला प्रवास करु शकतात. याशिवाय, बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल तिकीट पर्याय प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) कार्ड धारकांना देखील या डिजिटल बस सेवेचा लाभ घेता येणा आहे. या सेवेची अंमलबजावणी भारतातील परिवहन तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी “चलो" यांनी केली आहे.

बस प्रवासी बेस्ट चलो अॅप किंवा बेस्ट चलो बसकार्डद्वारे "टॅप इन" करुन पुढील दरवाज्याने बसमध्ये प्रवेश करतील आणि "टॅप आऊट” करुन मागील दरवाज्याने बसमधून उतरतील. त्याद्वारे तिकीट भाड्याचे प्रदान करु शकतील प्रवाशाने प्रवास केलेल्या अंतरावर आधारित प्रवासाच्या भाडेदराची परिगणना स्वयंचलितरित्या करण्यात येईल आणि सदर भाडे अॅपद्वारे वजा करण्यात येईल. मोबाईल अॅपचा वापर करणारे प्रवासी त्यांच्या अॅपवर तिकीटाची पावती पाहू शकतील आणि बस कार्डधारकांना “टॅप आऊट” केल्यावर तिकीटाची पावती त्यांना प्राप्त होईल. सुपर सेवर योजनाधारकांना आणि बस पासधारकांना देखील प्रवास करण्यासाठी सदर "टॅप इन" "टॅप आऊट” यंत्रणेचा वापर येईल.
या संपूर्ण स्वयंचलित तिकीट पध्दतीमुळे बेस्ट उपक्रमाला १०० टक्के डिजिटल पध्दतीच्या बसगाड्या वापरात आणणे शक्य होईल आणि बसप्रवाशांना त्यांची तिकीटे खरेदी करण्यासाठी रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे बस प्रवाशांचा प्रवास अधिक त्रासमुक्त आणि सुलभ होईल. ही बससेवा सुरुवातीला काही निवडक बसगाड्यांवर उपलब्ध असेल आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरामध्ये सदर सेवा उपलब्ध करण्यात येइल. जे प्रवासी या अॅपचा किंवा कार्डचा वापर करतील अशाच प्रवाशांना १०० टक्के डिजिटल बसगाड्यांचा वापर करण्याची मुभा असेल. या डिजिटल बसगाड्यांच्या वापर करण्याच्या बाबतीत नवीन असलेल्या बसप्रवाशांना सहाय्य करण्याकरिता सुरुवातीला बसवाहक देखील उपलब्ध असेल.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २१ डिसेंबर, २०२१ ला महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाच्या अधिपत्याखालील (Marquee) बेस्ट २० पुढे चला या मोहिमेचा शुभारंभ केला. या प्रकल्पांतर्गत बेस्ट उपक्रमाने मोबाईल अॅप, बस प्रवासी कार्ड सुरु केले असून सहभागीदार एनसीएमसी (NCMC )कार्डची सार्वजनिक चाचणी देखील घेण्यात आली होती. सदर डिजिटल कार्ड लोकार्पित केल्यामुळे आतापर्यंत १२ लाख वापरकर्त्यांनी सदर अॅप डाऊनलोड केले असून याद्वारे २ लाख बसकार्डस् जारी करण्यात आली आहेत.
या अॅपद्वारे एप्रिल-२०२२ या महिन्यामध्ये ६० लाख डिजिटल बसफेऱ्या करण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस असून त्याद्वारे भारतामध्ये डिजिटल बसगाड्या चालविणारा राज्य मार्ग परिवहन उपक्रम (STU) असेल. या घोषणेमुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर संपूर्णतः स्वयंचलित टॅप इन टॅप आऊट यंत्रणा देऊ करणारे मुंबई हे भारतामधील पहिले शहर असेल आणि सिंगापूर, लंडन, पॅरिस यांसारख्या शहरांच्या जागतिक बसचा अनुभव देणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश होईल.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply