महाराष्ट्र : सावरकरांचे वास्तव्य झालेली वास्तू उपेक्षितच

रत्नागिरी : रत्नागिरी नजीकच्या शिरगाव येथील दामले यांच्या घरी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे काही काळ वास्तव्य होते. सावरकरांचे वास्तव्य झालेली खोली दामले कुटुंबीयांनी सुमारे ९८ वर्षे जतन करून ठेवली आहे. मात्र, रत्नागिरीत येणारा पर्यटक अभावानेच ही वास्तू पहावयास जातो. वर्षाकाठी सरासरी पंचवीसही पर्यटक येथे येत नाहीत, अशी खंत प्रसन्न दामले यांनी व्यक्त केली.

सावरकर १९२४ साली ब्रिटीशांच्या बंदिवासात होते. या काळात रत्नागिरीत प्लेगची साथ आली होती. त्यामुळे सावरकर नाशिकला चार महिने वास्तव्य करून पुन्हा रत्नागिरीत आले. परंतु तेव्हाही प्लेगची साथ असल्याने शिरगाव येथील विष्णुपंत काशिनाथ दामले यांनी सावरकरांची भेट घेतली. ‘शिरगावच्या घरी एका बाजूची खोली आहे, ती धान्याची कोठडी आहे. तेथे राहाल का,’ अशी विचारणा केली. त्यावर, ‘काळ्या कोठडीपेक्षा तुमची कोठडी चांगलीच,’ असे म्हणत सावरकरांनी होकार दिला होता, असे प्रसन्न दामले यांनी सांगितले. रत्नागिरीत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सावरकरांचे वास्तव्य असलेली ही वास्तू महत्त्वाची ठरू शकते. मात्र, त्याचा पुरेसा प्रसार आणि पुरेशी माहिती देण्याचे काम सरकारी पातळीवर होताना दिसत नाही किंवा पर्यटनाला चालना देण्याचेही काम होत नाही.

सावरकर येथे राहत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी सावरकरांची भेट घेतली. मात्र, तेव्हा संघाची स्थापना झाली नव्हती. खडतर प्रवास करीत दूरवरून हेडगेवार सावरकरांच्या भेटीला आले, त्यानंतर संघाची स्थापना झाली. त्यामुळे त्या दोघांमध्ये याबाबत काहीतरी चर्चा झाली असावी, असे मत अनेकांनी नोंदवले आहे.

दामले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घराची खोली राहायला दिल्यावर ब्राह्मण समाजाने दामलेंचे घर वाळित टाकले. कारण तेथे सहभोजन, सार्वजनिक हळदीकुंकू असे समारंभ होत. प्रसन्न दामले यांचे आजोबा मोरेश्वर दामले यांच्या मुंजीला स्थानिक ब्राह्मणांनी येण्यास नकार दिला. त्यावेळी रत्नागिरीतील जोशी यांनी शिरगावात जाऊन त्यांची मुंज लावली, अशी आठवण आजोबा सांगायचे, असे प्रसन्न यांनी सांगितले. सावरकरांच्या प्रेमाचे प्रदर्शन करणारे अनेकजण रत्नागिरीत आले तरी या खोलीला भेट द्यायला अपवादानेच येतात. सहलीही येथे येत नाहीत, असे प्रसन्न यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply