बीड : विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; मराठा समाजाचा आवाज उंचावणारा नेता हरपला; आज अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात  आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार होते.  पहाटे पाचच्या सुमारास  भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला.  त्यांना तातडीने उपचार मिळू  शकले नाहीत, असा आरोप त्यांच्या वाहन चालकाने केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी स्थानिक पातळीवरचा पाच दिवसांचा नियोजित दौरा सोडून मध्यरात्रीच मेटे मुंबईकडे निघाले होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा महासंघाच्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानपरिषदेचे सदस्य राहणारे ते राज्यातील एकमेव नेते होत.

मराठा आरक्षणाच्या विषयावरील बैठक रविवारी सकाळी ११ वाजता बोलावली असल्याचा निरोप आल्यानंतर रात्रीच मेटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.  त्यांच्या मोटारीत त्यांचे सुरक्षारक्षकही होते. मेटे यांचे प्राथमिक शिक्षण दहावीपर्यंत झाल्यानंतर ते मुंबईत कामासाठी मामाकडे गेले.  उपजिविकेसाठी त्यांनी सुरुवातीला रंगकाम, भाजीपाला विक्री अशा प्रकारची कामे त्यांनी केली.  दरम्यानच्या काळात मराठा महासंघाचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या संपर्कात आल्याने मेटे चळवळीत ओढले गेले. आपल्या कौशल्यावर त्यांनी महासंघात स्थान निर्माण केले.

१९९५ च्या निवडणुकीपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मराठा महासंघाबरोबर भाजपची युती केली आणि यातूनच युतीची सत्ता आल्यानंतर वयाच्या २९ वर्षी १९९६ ला विनायक मेटे यांची पहिल्यांदा विधानपरिषद सदस्य म्हणून  नियुक्ती झाली.  सोमवारी बीडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘आयआरबी’ म्हणते.. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आमच्याकडून विलंब झालेला नाही, असे मुंबई-पुणे महामार्गावर टोल वसुलीचे काम करणाऱ्या ‘आयआरबी’ने म्हटले आहे. अपघाताची माहिती आमच्या कार्यालयाला सकाळी ५.४८ वाजता मिळताच पथक ५.५३ ला घटनास्थळी पोहोचले. ५.५८ वाजता गाडीतून सर्व जखमींना बाहेर काढून ६.१० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ‘आयआरबी’ने नमूद केल़े



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply