पुणे : विरोधामुळे रात्रीची अतिक्रमण कारवाई थांबविण्याचा निर्णय ; पथारी संघटना-अतिक्रमण विभागात वाद

पुणे : सार्वजनिक रस्ते, पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत परवानाधारक फेरीवाला व्यावसायिकांकडून व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन साधने आणि साहित्य काढून जागा मोकळी ठेवली जात नसल्याने अतिक्रमण विभागाने सुरू केलेल्या कारवाईला मोठा विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या रात्रीची कारवाई थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियमानुसार कारवाई करता येऊ शकते का, याबाबतचे मार्गदर्शन प्रशासनाने राज्य शासनाकडे मागितले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अधिकृत फेरीवाल्यांना रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. व्यवसायाची वेळ संपल्यानंतर व्यवसायाचे साधन, साहित्य आणि अन्य गोष्टी हटविणे पदपथ आणि रस्त्यावरील जागा मोकळी करणे आवश्यक आहे. मात्र अधिकृत फेरीवाल्यांकडून जागा मोकळी केली जात नसल्याचे अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास आले होते. परवानधारक फेरीवाल्यांकडून अटी-शर्तीचे उल्लंघनही होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवसायाची साधने, साहित्य हटवून जागा मोकळी न करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर कारवाई करण्यात येत होती. त्याला संघटनांनी विरोध दर्शविला होता. कारवाईवेळी पंचनामा केला जात नसल्याचा आरोपही संघटनांनी केला होता. कारवाईवरून पथारी संघटना आणि अतिक्रमण विभागात वाद सुरू झाल्याने सध्या कारवाई थांबवली आहे. रात्रीची कारवाई थांबवली असली तरी दुपारी दोन ते रात्री दहा या कालावधीत कारवाई नियमित सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अधिकृत परवानाधारक व्यावयायिकांनी मुदतीमध्येच व्यवसाय करावा आणि साहित्य तातडीने उचलावे, असे आवाहन अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून करण्यात आले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply