पुणे: विनापरवाना जाहिरात फलक, भित्तिपत्रके लावल्यास एक हजार रुपये दंड; दंड न भरल्यास मिळकतींवर बोजा

पुणे: सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक, कापडी फलक आणि भित्तिपत्रके लावणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक जाहिरात फलक, कापडी फलक आणि भित्तिपत्रकांसाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असून दंड न भरल्यास दंडाच्या रकमेचा बोजा मिळकतकरामध्ये चढविण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौकात विनापरवाना जाहिरात फलक, कापडी फलक आणि भित्तिपत्रके लावण्यात येत आहेत. त्यातून शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होत असून विनापरवाना जाहिरात फलकांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कठाेर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनापरवाना जाहिरात फलक, कापडी फलक किंवा भित्तिपत्रके लावण्यात आल्यानंतर त्यावर केवळ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत होती. मात्र आता दंडात्मक कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेच्या आकशचिन्ह आणि परवाना विभागाने अवलंबलेल्या धोरणानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा जाहिरात फलक आणि कापडी फलक लावणाऱ्यांविरोधात एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता प्रत्येक कापडी फलकामागे एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनीही मान्यता दिली आहे. छोट्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी भित्तिपत्रके लावणाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित आहे. सीमाभिंती, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बसस्थानके, विजेच्या खांबांवर भित्तिपत्रके लावणाऱ्यांकडूनही दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास ज्या व्यावसायिकांचे नाव जाहिरातीमध्ये किंवा भित्तिपत्रकामध्ये आहे त्याच्या मिळकतकरामध्ये ही रक्कम बोजा म्हणून चढविण्यात येणार आहे, असे माधव जगताप यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply