पुणे : रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे : बेकायदा आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाइक टॅक्सी उपयोजनवर (ॲप) बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी १२ डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी केले.

रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक), पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीनंतर बाइक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदा वाहतूक होऊ नये, यासाठी आरटीओकडून खास मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदा बाइक टॅक्सी ॲप चालविणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपायुक्तांमार्फत पाठपुरवा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply