पुणे : पळकुटे कोण, हे मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आव्हान

पुणे : पळकुटे कोण आहे, हे मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला फटकारले. विरोधकांनी एक शिवी दिली, की त्यांना शंभर दिवसातील एक विकासकाम दाखवायची, अशी सूचनाही सामंत यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना केली. येत्या काही दिवसांत कात्रज चौकात जाहीर सभा घेतली जाईल आणि किती विकासकामे झाली, याची माहिती दिली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

‘बाळासाहेबांची शिवसेना’ युवा सेनेच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उदय सामंत बोलत होते. युवा सेना सचिव किरण साळी, शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे या वेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करता आले नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिल्यानंतर बाळासाहेबांचा भास होतो. असे सामंत यांनी सांगितले. भविष्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा, असा सल्लाही त्यांनी दिला.

सामंत म्हणाले, की दसरा मेळाव्याच्या दिवशी अनेकांनी नकला केल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती. मात्र त्याचे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडलो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता सर्वांच्या लक्षात आले आहेत. अडीच वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत तेवढी विकास कामे शंभर दिवसात झाली आहेत. त्यासाठी कात्रज चौकात मेळावा घेण्यात येईल. कात्रज चौकात माझ्यावर हल्ला झाला होता. आताचा मेळावा दुसरीकडे होत आहे. त्यामुळे आता कात्रज चौकात मेळावा होईल. त्यामध्ये कोणावर टीका केली जाणार नाही. मात्र शंभर दिवसांत कोणती कामे झाली, याची माहिती दिली जाईल. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पुण्यात वाढल्याशिवाय राहणार नाही.तरुणांना उद्योगासाठी १० लाखांचे कर्ज लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. पुण्यात १ हजार ५०० उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असेही सामंत यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply