पुणे : नळस्टॉप चौकात उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अपघातानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. संगमेश्वर सिद्धराम साखरे (वय २८, रा. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वार साखरे हे नळस्टॉप चौकातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलावरुन पौडफाटा चौकाकडे जात होता.

त्या वेळी भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वार साखरेचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात साखरेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या साखरेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

नळस्टॉप चौकातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूल बांधण्यात आल्यानंतर हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. पूल उतरल्यानंतर पौडफाट्याकडे जाताना कोंडी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली होती. हा पूल वाहतुकीस खुला केल्यानंतर गंभीर स्वरुपाचा हा पहिला अपघात झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply